-
Home /
- Academics /
-
Other Departments and Centres /
- Bhagwan Shri Chakradhar Swami Chair /
About Us
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सत्र २०१९-२० मध्ये भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन स्थापन झाले. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दि. २३ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार या अध्यासनाला मान्यता मिळालेली आहे.
अमरावती मार्गावरील लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्था परिसरातील अध्यासनाच्या स्वतंत्र इमारतीचे दि. ११ डिसेंबर २०१९ रोजी नवनिर्मित भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनाचे डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी तसेच महानुभाव साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. लता लांजेवार उपस्थित होत्या.
भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन प्रमुख म्हणून डॉ. प्रमोद मुनघाटे (अतिरिक्त कार्यभार), प्राध्यापक, स्नातकोत्तर मराठी विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कार्यरत आहेत.
श्री चक्रधर स्वामी यांनी स्थापन केलेल्या महानुभाव पंथाकडे प्राचीन मराठी साहित्याची गंगोत्री म्हणून पहिले जाते. बाराव्या-तेराव्या शतकात महानुभाव साहित्यिकांनी महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी भाषा संपन्न केल्याचे निर्विवाद मान्य केले जाते. या पार्श्वभूमीवर भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनापुढे पुढील उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.
- महानुभाव संप्रदायाचे गद्य-पद्य उपलब्ध मुद्रित संपादित साहित्य, संशोधनपर संदर्भग्रंथ, संबंधित विषयासंबंधी कोश, नियतकालिके व अन्य संदर्भसाहित्याचे अद्ययावत ग्रंथालय निर्माण करणे.
- महानुभाव संप्रदायाच्या लेखक-कवींच्या हस्तलिखितांचे संकलन व जतन केंद्र निर्माण करणे. त्याकरिता हस्तलिखितांचा शोध घेणे, ते अध्यासनासाठी मिळविणे.
- महानुभाव संप्रदायाच्या गद्य-पद्य अप्रकाशित साहित्याचे अध्यासनाच्यावतीने संपादन करणे, अप्रकाशित व प्रसिद्ध साहित्याचे संशोधन करणे व ते प्रसिद्ध करणे.
- महानुभाव संप्रदायाच्या साहित्याचे ज्येष्ठ संशोधक व अभ्यासक यांना आमंत्रित करून संशोधनाच्या विविध समस्यांवर चर्चासत्र व कार्यशाळा आयोजित करणे.
- महानुभाव संप्रदायाच्या गद्य-पद्य साहित्यावर संशोधनासाठी संशोधनवृत्ती प्रदान करून योग्य तरुण अभ्यासकांकडून पूर्णवेळ किंवा बही:शाल पद्धतीने संशोधन-प्रकल्प घडवून आणणे.
- महानुभाव संप्रदायाचे तत्त्वज्ञान, विचार व आचरणपद्धती यासंबंधी प्रबोधनपर व्याख्यानसत्रे, स्पर्धा आयोजित करणे. या संदर्भातील सुबोधशैलीतील लघुपुस्तिका मान्यवर लेखकांकडून लिहून घेणे व ते प्रसिद्ध करणे.
- महानुभाव संप्रदायाचे तत्त्वज्ञान, विचार, आचरणपद्धती व उपलब्ध गद्य-पद्य साहित्य यावर आधारित अल्पमुदतीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविणे.